Ad will apear here
Next
कुम्बलंगी नाइट्स


डोळ्यांना तृप्त करणारा केरळचा वेगवेगळ्या छटांचा हिरवाकंच निसर्ग, रात्रीच्या वेळी हिऱ्यांसारखं चमचमणारं पाणी, मासे पकडण्याचं रेशमी भासणारं जाळं, गावातलं साधंसुधं शांत जगणं आणि त्यात घडत जाणारी एक गोष्ट... कुम्बलंगी नावाच्या केरळमधल्या एका गावात आई-वडिलांशिवाय राहणारी साजी, बोनी, बॉबी आणि फ्रँकी नावाची चार भावंडं... वडिलांचा मृत्यू झालेला आणि आई मुलांना सोडून कधीचीच नन झालेली... या मुलांचं घर एका बेटावर असलेल्या कचराकुंडीतल्या कचऱ्यासारखं... घराला ना प्लास्टर, ना एक वस्तू जागेवर... गावातले लोक या घराला आणि आसपास जमणारा कचरा आणि तिथे वावर असणाऱ्या कुत्र्यांना बघून हसत असतात. या चारही मुलांना ते नेपोलियनची मुलं म्हणून ओळखत असतात. 

मोठा भाऊ साजी स्वत: काहीच करत नसतो, तर एका गरीब तरुणाला कपड्यांना इस्त्री करायला लावून त्यातून मिळणाऱ्या पैशांत स्वत:चा खर्च भागवत असतो. दुसरा बोनी हा मुका असतो आणि तो डान्स शिकवत असतो. तिसरा या चित्रपटाचा नायक बॉबी हादेखील काहीही करत नसतो. चौथा फ्रँकी मात्र मिळणाऱ्या शिष्यवृत्तीतून हॉस्टेलवर राहून शिक्षण घेत असतो. सुट्टी लागली, की नाईलाजानं त्याला या कोंडवाड्यात राहायला यावं लागत असतं. 

या चौघांची तोंडं चार दिशेला असतात, आपसांत पटतही नसतं. घराला घरपण काय असतं ते त्यांना ठाऊकच नसतं. भरकटलेली, दिशाहीन अशी ही चार भावंडं रोजचा दिवस काढत असतात. फ्रँकी सुट्टीत आल्यावर घरात सगळ्यांसाठी स्वयंपाक करत असतो, तर घरात चालणाऱ्या मारामाऱ्या बघून बोनीला घरात यावंसंच वाटत नसतं. मित्रांच्या संगतीत या सगळ्यांचे दिवस जात असतात. यातल्या बॉबीच्या मनस्वी आयुष्यात बेबी या तरुणीच्या रूपात प्रेमाचा प्रवेश होतो... तसंच बोनीच्या आयुष्यातही एक आफ्रिकन पर्यटक येते.



मोठा भाऊ असूनही साजीचं घरात कोणीएक ऐकत नसतं. त्याला घरात काहीही मान नसतो. एके दिवशी फ्रँकीवर साजी चिडतो, म्हणून बोनी साजीवर हात उगारतो. त्यामुळे साजीला खूप अपमानास्पद वाटतं. रात्री इस्त्रीवाल्या तरुणाबरोबर दारू पीत असताना तो आपल्या मनातली खदखद त्याच्याजवळ व्यक्त करतो. त्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेला तो तरुण ही दारू आपण शेवटची घेणार असून, उद्यापासून इस्त्रीचं काम सोडून आपण आपल्या गर्भवती बायकोला घेऊन गावाकडे जाणार असल्याचं सांगतो. 

घरात लहान भावाकडून खाल्लेला मार, हाताखाली ठेवलेला तरुणही आपल्याला सोडून चाललेला आणि वर जाताना सल्ले देऊ पाहणारा... आपण एकटे पडलो आहोत या भावनेनं साजी जीव द्यायचा प्रयत्न करतो आणि त्याला वाचवण्याच्या नादात तो इस्त्रीवाला तरुण मरतो. तसं बघितलं तर तो एक अपघातच असतो. त्या मृत तरुणाची गर्भवती बायको पोलिसात साजीच्या विरोधात तक्रार नोंदवत नाही. कारण तिचा नवरा साजीला आपला मोठा भाऊच मानत असतो. पोलीस साजीला सोडून देतात. साजी अपराधी भावनेनं स्वत:ला दोष देत राहतो. बॉबीला लग्नासाठी बेबीच्या घरच्यांचा होकार मिळवण्यासाठी आता काम शोधावं लागणार असतं. तो माशांवर प्रक्रिया करणाऱ्या केंद्रात काम करायला लागतो; पण ते काम त्याला आवडत नाही. त्यांचं प्रेम मात्र बहरत असतं.

बॉबी आणि बेबीचं लग्न होतं का, साजी आपल्या अपराधी भावनेतून बाहेर येतो का, फ्रँकीला परिपूर्ण घर मिळतं का, चारही भावांमध्ये बाँडिंग कसं तयार होतं, चार तरुणांचा चाललेला सरळ-साधा प्रवास कसं वेगळं वळण घेतो हे सगळं प्रत्यक्ष अनुभवायचं असेल तर कुम्बलंगी नाइट्स हा चित्रपट आवर्जून बघायला हवा.

२०१९मध्ये प्रसारित झालेला मल्याळम भाषेतला कुम्बलंगी नाइट्स हा चित्रपट एकदम लै म्हणजे लैच भारी आहे. यातल्या चार भावांचं विखुरलेपण आणि नंतर तयार होणारं बाँडिंग खूप मस्त दाखवलं आहे. या चित्रपटाचं कथानकही मनाची पकड घेणारं आहे. या चित्रपटात वेगळं वळण घेताना फहाद फासील या अभिनेत्याची भूमिकादेखील लक्षात राहते.

कुम्बलंगी नाइट्स या चित्रपटातलं बॉबीचं प्रेमात पडल्यावरचं गाणं पुन्हा पुन्हा ऐकण्यासारखं आणि बघण्यासारखं आहे. शान निगमनं बॉबीची भूमिका झकास केलीय. यातली हिरोनी म्हणजे नव्यानं आलेली अॅान्ना बेन ही पोरगी मला जाम आवडली. इतकी साधी, पण डोळ्यात चमक असलेली, हसली की जिवाला घोर लावणारी अशी. यातले शान निगम, सौबिन शाहीर, श्रीनाथ भासी, मॅथ्यू थॉमस, हे चारही भाऊ, त्यांच्या मैत्रिणी, त्यांचे मित्र सारं काही मला भावलं; मात्र सगळ्यात काय विशेष असेल, तर या चित्रपटाची अप्रतिम हा शब्दही फिका पडावा अशी फोटोग्राफी! 

चित्रपट सुरू होतो, तेव्हापासून ते शेवटपर्यंत बाकी काहीही नाही लक्षात घेतलं तरी चालेल, पण फक्त समोरच्या पडद्यावर दिसणाऱ्या एक से एक फ्रेम्स बघत राहाव्यात अशा... सगळी दृश्यं म्हणजे... स्वप्नातली जादुई नगरी असावी अशी.... केरळमधल्या कोचीतलं कुम्बलंगी हे मासेमारीचा प्रमुख व्यवसाय असणारं गाव म्हणजे स्वर्ग असावा तर असाच असेल असं सांगणारं... शायजू खालिद या छायाचित्रकारानं हे इतकं सुरेखरीत्या टिपलंय, की ‘व्वा, क्या बात है’ असे शब्दही उच्चारू नयेत, बस्स मूकपणे फक्त बघत राहावं असं! 

म्हणूनच कुम्बलंगी नाइट्स या चित्रपटाची नामावळी दाखवताना छायाचित्रकाराचं शायजू खालिद हे नाव ठळकपणे झळकत राहतं. या चित्रपटाचं बजेट साडेसहा कोटी रुपये होतं; मात्र बॉक्स ऑफिसवर ३९ कोटींचा धंदा या चित्रपटानं केला. कुम्बलंगी नाइट्स या चित्रपटानं उत्कृष्ट चित्रपट म्हणून, कॅरक्टर रोलबद्दल, संगीताबद्दल, छायाचित्रणाबद्दल, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याबद्दल, सहायक अभिनेत्याबद्दल, नायिकेच्या नव्या चेहऱ्याबद्दल, पटकथेबद्दल, चित्रपटाच्या संकलनाबद्दल, गीतलेखनाबद्दल, दिग्दर्शनाबद्दल मानाचे अनेक पुरस्कारही पटकावले आहेत. समीक्षकांनी या दशकातला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘कुम्बलंगी नाइट्स’ला गौरवलं आहे.

जरूर बघा, तुम्हालाही नक्कीच आवडेल - कुम्बलंगी नाइट्स!

- दीपा देशमुख, पुणे 
ई-मेल : adipaa@gmail.com


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MUSKCV
Similar Posts
त्रिभंग तीन पिढ्यांतल्या तीन बंडखोर स्त्रियांची गोष्ट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘त्रिभंग’ या चित्रपटात दाखवली आहे. तन्वी आझमी, काजोल आणि मिथिला पारकर या तीन गुणी अभिनेत्री एकत्र बघायला मिळणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणीच आहे. साहित्य अकादमीनं गौरवलेली नयनतारा (तन्वी आझमी), ओडिसी नर्तकी आणि अभिनेत्री अनुराधा
पुरुष स्त्रीमध्ये नेमके काय शोधत असतो? ‘What man really looks in woman?’ हा प्रश्न बऱ्याच स्त्रियांना पडत असावा. तसाच तो पुरुषांच्याही कायम डोक्यात असतोच! या प्रश्नाचे उत्तर ‘स्लीपलेस इन सिअॅटल’ या हॉलिवूड चित्रपटातून मिळते. या चित्रपटाबद्दल श्रीराम जोशी यांनी लिहिलेले हे चार शब्द...
उत्खनन १९३९च्या मे महिन्यात उत्खनन करणारा बेसिल ब्राउन एडिथ प्रिटी या महिलेच्या ‘सफोक’ या इंग्लंडमधल्या परगण्यात खोदकाम करायला हजर होतो. पुरातत्त्वशास्त्रातलं आजतागायत अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलेलं एक उत्खनन तो करतो. ‘द डिग’ या नेटफ्लिक्सवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची ही मध्यवर्ती संकल्पना. हा चित्रपट
‘पेले’ डॉक्युमेंटरी : ब्राझीलमधल्या एका कालपटाचा इतिहास ‘तो देशाचा विजय होता. तो (फुटबॉल या) खेळाचा विजय नव्हता...’ ‘पेले’ या नेटफ्लिक्सवरच्या डॉक्युमेंटरीमध्ये १३६३ गेम्समध्ये १२७९ गोल करणारा पेले स्वत: हे शेवटचं वाक्य म्हणतो. यामागचे संदर्भ ती डॉक्युमेंटरी पाहताना कळत जातात.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language